सिन्नरला बायोडिझेल पंपावर पोलिसांचा छापा

नाशिक । प्रतिनिधी

सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीतील नाशिक ग्रामीण पोलिसांनी बायोडिझेल पंपावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी बायोडिझलची सर्रासपणे विक्री सुरू आहे. कुठलाही परवाना अथवा लायसन्स नसलेले अनेक जण बायोडिझलच्या विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुन्हा कारवाईला सुरवात करत पंप मालकांना इशारा दिला आहे. त्यातच सिन्नर येथील एमआयडीसीत अवैधरित्या बायोडिझलची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली.

या कारवाईत तब्बल ४० हजार लिटर बायोडिझेल तर २०/२० हजार लिटरच्या २ टॅंक आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत पोलीसांनी सर्व साहित्य सील केले असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.