लसीकरणासाठी वाट्टेल ते ! जव्हारमध्ये ड्रोनव्दारे लस पोहचवली

नाशिक । प्रतिनिधी
जव्हारसारख्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहोचवण्याचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अभिनंदन केले.

जव्हार स्टेडियम ते झाप गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २५ किमीचे अंतर आहे. रस्ते मार्गोने झापमध्ये पोहोचण्यास एक तास लागतो. पण ड्रोनच्या सहाय्याने केवळ ९ मिनिटात कोविशिल्ड लसीचे ३०० डोस झापमध्ये पाठविण्यात आले. त्यातून ३०४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. हा उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाने ब्ल्यू इन्फिनिटी इनोव्हेशन लॅब आणि आयआयएफएल फाऊंडेशनच्या मदतीने राबवला.

या उपक्रमाबदद्ल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची देशपातळीवर सर्वप्रथम अंमलबजावणी करत महाराष्ट्राने नेहमीच पाऊल पुढे टाकले आहे. ड्रोनद्वारे लस वाहतूकीच्या या उपक्रमाने दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची आरोग्य रक्षणाची वाट अधिक प्रशस्त आणि सोपी झाली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा जनहितासाठी किती उत्तमपणे उपयोग करून घेता येतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी कर्तव्याप्रती समर्पित राहून एका वेगळ्या उर्जेने काम केल्याबद्दल तसेच सर्वसामान्यांची आरोग्य सुविधा प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत वेगाने पोहोचवल्याबद्दल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास, पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह आरोग्य विभागातील तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतूक केले आहे. ड्रोनच्या सहाय्याने झालेली लस वाहतूक हे एक पथदर्शी उदाहरण आहे. याबरोबरच भविष्यात औषध, रक्त पुरवठ्यासह अवयव प्रत्यारोपणाच्या कामालाही एक नवी दिशा मिळणे शक्य होणार असल्याचा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.