‘शिवसेनेचा गद्दार मी नव्हे तर अनिल परब आहे’ : रामदास कदम

नाशिक । प्रतिनिधी

शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अनिल परब हे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घशात घालायला निघाले आहेत असा खळबळजनक आरोप करत ‘शिवसेनेचा गद्दार मी नव्हे तर अनिल परब आहे’ असेही म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

रामदास कदम हे पत्रकार परिषदेत बोलत होते. कदम हे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिवसेनेच्याच एका नेत्याने आपल्याच पक्षाच्या मंत्रीपदावर असलेल्या नेत्यावर आक्रमक शब्दात टीका करावी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावेळी ते म्हणाले कि, मी कुठेच पक्षाच्या विरोधात बोललो नाही. मी केवळ अनिल परब यांच्यावर बोललो आहे. जर अनिल परब म्हणजेच पक्ष असेल तर आम्ही कायमचं घरी बसू. त्याला काही ईलाज नाही. अनिल परब म्हणजेच शिवसेना असे असेल आणि रामदास कदम यांचे शिवसेनेसाठी काहीच योगदान नसेल अशी भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याला कोण काय करु शकतं? असे प्रश्नार्थक उद्गारही रामदास कदम यांनी या वेळी काढले.

यावर मनातरी अनिल परब यांनी मौन सोडले असून त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे. ‘रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाविरुद्ध मी काहीही बोलणार नाही. ते शिवसेना नेते आहेत. मी एक सामान्य शिवसैनिक आहे. त्यामुळे त्यांचे आरोप आणि वक्तव्ये याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्षच घेईल. मी त्यावर काहीही बोलणार नाही’, असे परब यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

त्यामुळे आधीच महाविकास सरकारमध्ये तू तू मै मै सुरु असताना आता शिवसेनेच्या गोटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान रामदास कदम यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील पात्र लिहिले आहे. त्यावरून देखील वाद चिघळण्याची शक्यता आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि, ‘अन्याय किती सहन करायचा याला देखील मर्यादा असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माझी हात जोडून विनंती आहे की, तुम्ही स्वत: यामध्ये लक्ष घाला. अनिल परबच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याचे पाय जमिनीवर नाही. त्याचे पाय पुन्हा जमिनीवर आणा.’ अशा पद्धतीचा आशय या पत्रात आहे.