नाशिक । प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटायचं नाव घेत नसतांना नाशिकमधील एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी चा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
पंचवटीतील शांतिनगर भागात राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी औषधी गोळ्यांचे अतिसेवन करीत तसेच गळफास लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या सुरू असलेले आंदोलन व त्यातून निर्माण झालेल्या तणावातून कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशाल प्रकाश कुमावत (३५ रा. रामप्रसादनगर, शांतिनगर) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड न देखील लिहल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये ‘मम्मी-पप्पा मला माफ करा. पण मी आता तुम्हाला त्रास देणार नाही. खरंच खूप खूप सॉरी! माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मी इथून पुढे तुम्हाला कधीच त्रास देणार नाही, अशा आशयाची चिठ्ठी मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. कुमावत यांनी मध्यरात्रीनंतर प्रमाणापेक्षा जास्त औषधी गोळ्यांचे सेवन केले. यानंतर त्यांनी घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास लावून घेतला. ही बाब वेळीच निदर्शनास आल्याने पुढील अनर्थ टळला. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. कुमावत हे एसटी महामंडळात चालक आणि वाहक म्हणून काम करतात. सध्या सुरू असलेली आर्थिक ओढाताण आणि संपावर तोडगा निघत नसल्याने कुमावत तणावात होते. त्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. वेळीच उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाला मात्र या घटनेची सायंकाळपर्यंत माहिती मिळालेली नव्हती.