मालेगाव येथील सिनेमागृहात सलमानच्या एंट्रीवर फोडले फटाके

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव शहराताल सुभाष चित्रपटगृहात सलमान खानचा चित्रपट सुरू असतांना त्याच्या चाहत्यांनी थेट चित्रपट गृहात फटाके फोडल्याची घटना घडली. यापूर्वी अनेकदा या चित्रपटगृहात फटाके फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी मालेगांव छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव मध्ये सलमान खान, शाहरुख खान,अमिताभ बच्चन अशा अभिनेत्यांचे चाहते असून त्यांचा नवीन चित्रपट आला की त्यांचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत असतात आणि त्याची पडद्यावर एन्ट्री होताच काही उत्साही चाहते मात्र थेट फटाके फोडून आनंद व्यक्त करीत असतात. सध्या चित्रपटगृहात सलमान खानचा अंतिम हा सिनेमा सुरु आहे. मालेगावमध्येही या चित्रपटाचे शोज सुरु आहेत. यावेळी काही वात्रटपणा करणाऱ्या तरुणांनी सलमानच्या एंट्रीवर फटाके फोडून जल्लोष केला. यामुळे सिनेमागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

यापूर्वी सलमान खानच्या ट्युबलाईट हा सिनेमा प्रर्दशित झाल्यानंतरदेखील असाच प्रकार घडला होता.