मनसैनिकांनी सायकलवरून गाठले जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये मनसेच्या वतीने पेट्रोल व डिझेलवरील दरवाढीविरोधात आज सायकल मोर्चा काढण्यात आला होता. नाशिकमधील मनसैनिकांनी सायकल चालवून राज्य सरकारचा निषेध केला.

सध्या पेट्रोलची किंमत आज ११० रुपये प्रति लिटर पेक्षा जास्त झालेली आहे. त्यामुळे मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी सायकल मोर्चाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी मनसेच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत सायकलवर स्वार होत मनसे पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पेट्रोल व डिझेल दरवाढीचा राज्यतील सर्व सामान्य जनतेला फटका बसणार आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्यावर दैनंदिन व्यवहारातील वस्तूंच्या किमती सुद्धा वाढणार आहेत. राज्य सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये व ही पेट्रोल दरवाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली.

ज्याप्रकारे केंद्राने काही दिवसांपूर्वी इंधनावरील कर कमी केला होता, त्याच पद्धतीने राज्य सरकारने देखील हे कर कमी करून इंधनाचे दर कमी करावे अशी प्रमुख मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. ही मागणी सरकारने मान्य केले नाही तर यापुढे अधिक तीव्र पद्धतीने आक्रोश मोर्चा काढू असा इशारा यावेळी मनसे नेत्यांनी दिली.