बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना; कलम १४४ लागू

नाशिक । प्रतिनिधी

कर्नाटकातील बंगळुरु येथे शुक्रवारी रात्री उशिरा संभाजी सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्याचसोबत या प्रकाराने राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कर्नाटकातील बंगळुरूजवळील सदाशिवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यामुळे परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाले असून अनेकांनी चौकामध्ये जमून रस्ते बंद केले. त्यामुळे शनिवारी बेळगावमध्ये शहर बंद असल्याचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. सकाळपासूनच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहत आहेत तर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी यास पाठिंबा द्यावा असे आवाहनही करण्यात आलेआहे.

दरम्यान त्या घटनेचे आता पडसाद महाराष्ट्रात ही उमटू लागले आहेत. विटंबनेची बातमी समाजमाध्यमांवर व्हायरल होताच शुक्रवारी रात्री कोल्हापुरात पडसाद उमटले. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणा देत कोल्हापूर परिसरातील कन्नड भाषिकांची हॉटेल्स तसेच दुकाने बंद पाडली. दरम्यान, शहरात सर्वत्र बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

बेळगावात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पोलिसांनी शहरात १४४ कलम लागू केले आहे. शनिवारी सकाळी ८ ते रविवार सकाळी ६ वाजेपर्यंत कलम १४४ लागू असणार आहे. संपूर्ण शहरामध्ये प्रतिबंधात्मक सूचना दिल्या असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.