टीईटी परीक्षेतही घोळ, आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

नाशिक । प्रतिनिधी

आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षेत देखील घोळ झाला असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. सुपे यांच्याकडून कोट्यधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली आहे.

दरम्यान सुपे यांना कालच पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सुपेंवर शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप करण्यात आला असून चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पुणे पोलिसांनी राज्य सरकारच्या परीक्षा पेपरफुटीनंतर पत्रकार परिषदेत हा खुलासा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध परीक्षांच्या पेपर लीक होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये आता टीईटी परीक्षेची भर पडली आहे. टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पार पाडली जाते. गेल्या २१ नोव्हेबरला हि परीक्षा राज्याच्या विविध परीक्षा केंद्रावर पार पडली. यापूर्वी म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणात प्रीतीश देशमुख यांना अटक करण्यात आली होती. यानंतर देशमुख यांच्या घरझडतीमध्ये २०२० मध्ये टीईटी परीक्षेत अपात्र काही विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे लागली होती. दरम्यान, टीईटी परीक्षेशी निगडित असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांची पोलिसांनी चौकशी केली होती.

त्या चौकशीनंतर सुपें यांना पोलिसांनी अटक केली असून या संपूर्ण घोटाळ्यात ४ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे लोक ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत पैसे घेत होते. यातील तुकाराम सुपेकडून तब्बल ८८ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली.