कुणी धरण देत का धरण? पाण्यासाठी गावकऱ्यांचा टाहो

नाशिक । प्रतिनिधी

कडवईपाडा (ता.पेठ) परिसरात केरनदीवर होणारे धरण गेल्या ४० वर्षांपासून रखडले आहे. वन विभागाच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हे धरण रखडले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यासंदर्भात घनशेतच्या हनुमान मंदिरात बैठकीत गावकऱ्यानी आपल्या समस्या मांडल्या.

नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील कडवईपाडा शिवारात केरनदीवर ४० वर्षांपूर्वी धरण बांधण्यासाठी बांध घालण्यात आला. मात्र वनविभागाच्या आडमुठेपणामुळे, तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने हे कामकाज अर्धवट अवस्थेत राहिले. स्थानिक गावानी वारंवार पाठपुरावा केला मात्र यश आले नाही. या घटनेला तब्बल ४० वर्षे उलटून गेली असली तरी अद्याप धरणाचा पत्ता नसल्याने गावकरी चिंता आहेत. यावेळी गावकरी म्हणाले कि, धरण नसल्यामुळे आमच्या भागाचा मूलभूत विकास झाला नाही. रब्बीची पिके होत नाही, विहिरी जानेवारीत आटतात, स्थानिकांना रोजगार नसल्याने स्थलांतरित होतात. महिलांना दुरून पाणी आणावे लागते. प्रसंगी दूषित पाणी प्यावे लागते, त्यामुळे अनेक आजार बळावतात, हे सर्व प्रश्न केवळ धरण रखडल्याने आम्ही सोसत असल्याचे मत यावेळी गावागावातील उपस्थितांनी व्यक्त केले. त्यामुळे येत्या काळात जर धरण झाले नाही तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा देखील यावेळी गावकऱ्यांनी दिला.

यावेळी घनशेतच्या बैठकीत समुदाय माध्यमकर्मी मायाताई यांनी केरनदीवरील धरणाची वृत्तमाहिती चित्रीकरण यावेळी नागरिकांना दाखवण्यात आली. त्यानंतर ग्रामविकास अभ्यासक राम खुर्दळ यांनी केरनदी धरणाबद्दल व यामुळे उद्भवल्या अडचणी तसेच धरणासाठी यापुढे सामाजिक पाठिंबा, योग्य पाठपुरावा करण्यासाठी लोकसंवाद, जागृती कृतीशील पाठपुरावा केल्यास निश्चित यश येईल, त्यासाठी एक व्हा असे आवाहन केले. त्यानंतर जर्नलिष्ठ फोरमचे प्रवर्तक आनंद पगारे यांनी याबाबतीत आम्ही आपल्याला योग्य दिशा देण्यासाठी येथे आलोय, धरण होईपर्यंत एकोप्याने पाठपुरावा करा असे सांगितले.

दरम्यान यावेळी केरधरण निर्माण कृती समितीत परिसरातील विविध गावाचे माजी सरपंच रामदास दामू जाधव, हभप.जगदीश जाधव, भ्रष्ट्राचार विरोधी समितीचे रमेश ठाकरे,देवराम धूम, विनायक महाले, कैलास चौधरी, रामदास सोनवणे, गणपत गावित, निवृत्ती चौधरी, माजी सभापती मनोहर चौधरी, नामदेव सहारे, भरत भांगरे, विठ्ठल सिताड, नामदेव सहारे, हिरामण वाघले, वामन कुंभार, सुभाष गवळी, सुभाष सहाळे, अंबादास भुसारे यांची संयुक्त कृती समिती धरण निर्माण कार्यासाठी करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील भाऊराव चौधरी, कवी प्रकाश कुंभार, रामदास सोनवणे, जयराम जाधव, ग्रामसेविका कविता महाले, ग्रामसेवक भाऊसाहेब बोसारे यासह परिसरातील अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.