जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक विभागात शॉर्टसर्किट

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक विभागात शॉर्टसर्किट झाल्याने विभागातील बालकांना तातडीने दुसरीकडे दाखल करण्यात आले. यामुळे पुढील अनर्थ टळला असून सुदैवाने जीवितहानी किंवा कुणासही इजा झाली नाही.

जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि.२२) नवजात अर्भकाच्या विभागात अचानक शॉर्ट सर्किट झाले. हॉस्पिटलच्या समय सूचकतेमुळे सर्व अर्भकांना तातडीने दुसरीकडे स्थलांतरित केले. तसेच विजेच्या कामासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून तत्काळ वायर बदलण्यासह अन्य उपाययोजनांना प्रारंभ करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात अचानकपणे घडून आलेल्या या शॉर्टसर्किट प्रकारामुळे पुन्हा एकदा रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यात भंडारा तसेच नगर जिल्ह्यात झालेल्या जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना यांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेने अधोरेखित झाली आहे.