‘वाद’ळात अडकलेलं नाशिकचं साहित्य संमलेन…!

नाशिक । प्रतिनिधी

साहित्य संमेलने हि महाराष्ट्राची ओळख आहे. यात महिलांची, बाल-कुमारांची, नवोदितांची, होतकरूंची, ग्रामीण, दलित इत्यादी विविध प्रकारची मराठी साहित्य संमेलने महाराष्ट्रात आयोजि केली जातात. या सर्व संमेलनांमध्ये ‘अखिल भारतीय मराठी साहित्य – संमेलनास विशेष महत्व दिले जाते. कारण राज्यभरातून सारस्वतांचा मेळा संमेलनस्थळी भरलेला असतो, त्या माध्यमातून मराठी साहित्याचा गौरव केला जातो. मात्र मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची बातमी येताच त्यासंबंधातल्या वादांनाही तोंड फुटते आणि ते संमेलन संपेपर्यंत त्यात अनेक प्रकारचे वाद सुरू राहतात.

अलीकडेच साहित्य नागरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात ९४ वे अखिल भारतीय मराठी हि साहित्य संमेलन होत आहे. मात्र या संमेलनाच्या तारखांपासून ते आतापर्यंत वाद पाहायला मिळत आहेत. सुरवातीलाच संमेलनाच्या तारखेवरून चांगलाच वाद रंगला. हा वाद शमतो न शमतो तोच संमेलन स्थळावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यांसह अनेक वाद विवाद संमेलनाच्या बाबतीत पाहायला मिळाले. म्हणजेच संमेलनाच्या सुरवातीपासून ते आतापर्यंत वादच निर्माण झाल्याने अवघ्या चार पाच दिवसांवर येऊन ठेपलेले साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडणार नाही , म्हणजे मिळवलं.

साहित्य संमेलनाच्या गीतावरून दोन तीन विषयासंदर्भात वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यापैकी नाशिकमध्ये होणाऱ्या ९४व्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक लोकहतिवादी मंडळ आहे. समाजसुधारक गोपाळ हरी देशमुखांच्या नावाने हे मंडळ चाललवले जाते. मात्र, संमेलन गीतामध्ये त्या लोकहितवादी यांच्या ऐवजी चक्क नाना शंकरशेठाचा फोटो टाकण्यात आला आल्याने निमंत्रकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र लवकरच यात दुरुस्ती करीत हा वाद मिटवण्यात आला. त्यानंतर साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये वापरण्यात आलेल्या दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता. या गीतात वापरण्यात आलेले व्हिडिओ चोरून वापरण्यात आल्याचा आरोप सोशल मिडीयावर करण्यात आल्याने संमेलन गीतावर नामुष्की ओढवली होती. गीतात चोरून इतर कलाकार आणि निर्मात्यांची व्हिडिओ क्लिप वापरणे हा कलाकारांचा अनादर असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आली होती. परंतु आयोजकांनी सारवासारव करीत हा हि वाद मिटवला होता. याच संमेलन गीतामध्ये भूमीपुत्र आणि साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिक वि. दा. सावरकर यांचे नाव न घेतल्याने सावरकर समर्थक आक्रमक झाले होते. त्यावरून प्रचंड वाद झाला होता. अखेर गीतामध्ये सावरकरांचे नाव समाविष्ट करण्यात आले.

दरम्यान साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून नुकतेच नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जावेद अख्तर हे असणार आहेत. यावरून देखील एका संघटनेने वादाला निमंत्रण दिले होते. या संघटनेच्या मते मराठी राज्यभाषा असून जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा सहावा क्रमांक लागतो. या भाषेने अनेक विचारवंत साहित्यिक या मराठी मातीला दिले. मात्र हिंदूंवर अन्याय झाल्यांनतर मूक गिळून बसणारे जावेद अख्तर संमलेनाचे प्रमुख पाहुणे कसे? असा सवाल या संस्थेने उपस्थित केला होता.

त्यानंतर नुकतीच साहित्य संमेलनाची कार्यक्रम व निमंत्रक पत्रिका जाहीर करण्यात आली. यामध्ये नावांवरून मानापमान नाट्य पाहायला मिळाले. साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्यासह १९ नावांचा समावेश होता. मात्र, निमंत्रणपत्रिका छापताना ऐनवेळी सहकार्यवाह पदांमध्ये एक नाव घुसवण्यात आले आहे. पत्रिकेत ऐनवेळी नाव आल्याने साहित्यिक वर्तुळात चर्चेचे वातावरण आहे. संमेलनाच्या कवी कट्टा समितीचे प्रमुख संतोष वाटपाडे यांनी थेट आयोजकांना पात्र लिहून याचा जाब विचारला आहे. तर दुसरीकडे ‘मराठी नाटक : एक पाऊल पुढे, दोन प[पाऊल मागे’ या परिसंवादाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी नाशिकचे नाट्यलेखक दत्ता पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र निमंत्रणपत्रिकेतून त्यांचाच पत्ता कट केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

त्याचबरोबर संमेलन स्थळी असलेल्या विविध सभागृहांना नाव देण्यावरून अनेक वाद झाले. त्यामध्ये मनसेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती. यावर अनेक दिवस वादही झाले. मात्र नुकतेच स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी या मागणीला मान्यता दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नाशिक छात्रभारतीने बाबुराव बागुल आणि महाकवी वामनदादा कर्डक यांची नावे सभागृहांना देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र यावर अद्याप कोणतेही पाऊल आयोजकांनी उचलले नसल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर आलेलं असतांना संमेलनाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे या साहित्य संमेलनावरून दररोज नवनवीन वाद निर्माण होत आहेत. साहित्य संमेलन कोठे घ्यावे, ते कसे घ्यावे इथपर्यंत वाद झाले. किमान आतातरी रुसवे फुगवे बाजूला ठेऊन आयोजकांसह सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. गोदानगरीतील हे साहित्य संमेलन ‘निर्विघ्न’ पार पडो अशी प्रार्थना सध्या नाशिककर करतांना दिसत आहेत.