नाशिक | प्रतिनिधी
वेळ दुपारी तीनची. सातपुर परिसर..! दुपारची वेळ असल्याने परिसरात वर्दळ.. अशातच एका घटनेने बघ्यांचे लक्ष वेधून घेतले. एवढंच काय तर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले, मात्र इथं घडलं वेगळंच..!
झालं असं , सातपूर परिसरातील गोरक्षनाथ पुल येथे नंदिनी नदीपात्रात सकाळी नागरिकांना एक व्यक्ती अंगावर चादर ओढून पडला असल्याचे दिसून आले. यामुळे स्थानिक नागरिकांची हळूहळू गर्दी वाढू लागली. नागरिकांनी त्या ठिकाणी दगड फेकून, आवाज देऊन त्या व्यक्तिला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, ही व्यक्ती काही उठेच ना …!
त्यामुळे नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु झाली. सदर व्यक्ती ही मयत असल्याचा कयास नागरिकांनी बांधला. सदर व्यक्ती ही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने अखेर, काय तर नागरिकांनी थेट सातपूर पोलिसांना याबाबत माहिती कळवली.
घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा देखील सदर ठिकाणी दाखल झाला. तर नदीपात्रात एका कोरड्या ठिकाणी एक व्यक्ती त्याच्या अंगावर चादर असल्याचं पोलिसांना देखील दिसून आले, जोरात आवाज देऊन देखील हा व्यक्ती कुठलीही हालचाल करत नसल्याने पोलिसांना देखील वेगळा संशय बळावला होता. त्यानंतर सदर व्यक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. शेवटी पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहचले. आणि सदर व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न केला असता ही व्यक्ती अचानक उठून बसली आणि सदर व्यक्तीबाबत सुरू असलेला तर्कवितर्कांना विराम मिळाला.
अखेर पोलिसांनी या व्यक्तीला त्या ठिकाणाहून हटकून बाहेर येण्यास सांगितले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता सदर व्यक्ती स्थानिक परिसरातील असून त्या ठिकाणी आपली काम आटोपल्यानंतर रोज काही काळ विश्रांतीसाठी झोपत असल्याचं सदर व्यक्ती कडून सांगण्यात आले. अचानक एवढे नागरिक आणि पोलिस बघून सदर व्यक्ती देखील काही काळ चक्रावून गेले होती.