नाशिकला स्मार्ट करतांना गोदाकाठचा सत्यानाश करू नका !

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक स्मार्ट सिटी पौराणिक गोदाघाटांची तोडफोड करून नाशिकच्या वैभवाचा सत्यानाश करत असल्याचे आरोप करत स्थानिक नागरिकांनी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे पत्र शहराध्यक्ष अंबादास खैरे व ऍड. चिन्मय गाढे यांनी स्थानिक नागरिकांसमवेत गोदा प्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी, पुरोहित महासंघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पांडे यांना दिले.

नाशिकला पौराणिक, ऐतिहासीक, सामाजिक आणि सांस्कृतिक असे अनन्यसाधारण महत्व आहे. नाशिक हे श्रद्धेचे शहर असून गंगाघाट परिसरात अनेक सुंदर मंदिरे आणि प्राचीन घाट आहेत. हे सुंदर मंदिरे व प्राचीन घाट बघण्यासाठी देश-विदेशातील भाविक व पर्यटक गंगाघाट परिसरात मोठ्या संख्येने येतात. याच प्राचीन घाटांवर बारा वर्षातून एकदा सिहंस्थ कुंभमेळा होत असतो.

नाशिक मधील गंगाघाट परिसराला अनन्य साधारण महत्व असताना नाशिक स्मार्ट सिटीचा अंधाधुंद कारभार सुरु आहे. गोदावरी मातेचे रूपड बदलण्याऐवजी नको त्याठिकाणी नाक खुपसण्याचे काम नाशिक स्मार्ट सिटी करत आहे. नदीपात्रातील सिमेंटचा भाग काढण्याऐवजी दगडी पाषाणाचे पौराणिक घाट व पुरातन मंदिर पाडून नाशिकचे वैभव घालण्याचे दुर्दैवी कारस्थान केले जात आहे.

नाशिक स्मार्ट सिटीमार्फत केला जाणारा सत्यानाश कदापि सहन केला जाणार नाही. याविरोधात स्थानिक नागरिकांनी केलेल्या प्रत्येक आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सदैव स्थानिक नागरिकांसोबत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.