पालखेड डावा कालव्यातुन महिनाभर आवर्तन सुरु राहणार

नाशिक । प्रतिनिधी

पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने पालखेड डावा कालव्याचे सिंचनाचे दुसरे आवर्तन १० मार्च पासून देण्याचे आदेश राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा पिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

येवला तालुक्यासह परिसरात विहिरींनी तळ गाठला असून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केलेली होती. त्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दि.१० मार्च पासून पालखेड डावा कालव्याचे दुसरे आवर्तन व ते संपल्यानंतर आकस्मित आरक्षणाचे आवर्तन त्यास जोडून देण्याचे आदेश पालकमंत्री यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

सदर आवर्तन महिनाभर सुरु राहणार असून पालखेड डावा कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे मार्गी लागणार आहे.आकस्मित आरक्षणात समाविष्ट असलेले बंधारे आकस्मित आवर्तनातून भरले जाणार आहे. यातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा शेतीसोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.