विद्यार्थ्यांमध्ये जाती धर्माचं विष पेरण्याचं काम करू नका : पालकमंत्री भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी

शांततेन सत्याग्रह करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, त्यामुळे सत्याग्रह करणे चुकीचे ठरत नाही, मात्र हिंसाचार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

मालेगाव मध्ये कर्नाटक हिजाब प्रश्नी मुस्लिम महिला हिजाबला समर्थन देण्यासाठी हिजाब परिधान करून एकत्र येणार होत्या. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करणे आवश्यक आहे, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाला नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे.

ते पुढे म्हणाले कि, सध्या देशभरात जातीपातीचे राजकारण केले जात आहे. यामध्ये राजकीय पुढारी तरुणांना उकसवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मोठ्या नेत्यांना माझी विनंती आहे, विद्यार्थ्यांमध्ये जाती धर्माचं विष आत्ताच पेरण्याचं काम करू नका, विद्यार्थी शिक्षण प्रिंय असतात. या वयात त्यांना योग्य शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी समाज आणि देशाला पुढे नेण्याचं शिक्षण दिल पाहिजे, त्यामुळे मुलांमध्ये जाती धर्माच्या नावांच्या भिंती उभ्या करणं देशाच्या दृष्टीने हिताचं नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

कर्नाटकात हिजाबप्रश्नी झालेल्या घटनेनंतर राज्यभर समर्थनार्थ व विरोधात आंदोलन केली जात आहेत. त्याचा पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापले आहे.