प्रभाग आरक्षणाच्या फेक मेसेजने इच्छुकांना धडकी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका निवडणुकीचा बिग वाजला असून प्रभाग रचना देखील जाहीर झाली आहे. मात्र अशातच प्रभाग आरक्षणाचा फेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुकांच्या मनात धडकी भरवली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच आरक्षणविरहित प्रारूप प्रभागरचना घोषित झाल्या असून अद्याप आरक्षणाच्या सोडतीची तारीख घोषित झाली नसताना गुरुवारी (दि. १०) प्रभागनिहाय आरक्षणाचा तक्ता सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि अनेक राजकीय इच्छुकांना काळजाचा ठोका चुकला. मात्र चौकशीअंती फेक मेसेज असल्याचे सांगण्यात आले.

आगामे महापालिका निवडणूक जाहीर होणे बाकी आहे. त्याबरोबर कोणत्या प्रभागात महिला व पुरुष आरक्षण आरक्षण संख्या किती राहणार अनुसूचित जाती जमाती आरक्षण कसे पडणार हे बाकी असून , मनपा निवडणुकीत उतरणाऱ्या अनेक इच्छुकांचे त्यावरच राजकीय भवितव्य ठरणार आहे. गुरुवारी दुपारी सोशल मीडियावर मनपा निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्याची यादी व्हायरल झाली. त्या यादीत १ ते ४४ प्रभाग असून प्रभाग असून, प्रभागनिहाय कुठल्या प्रभागात किती महिला व किती पुरुष तसेच कोणत्या प्रभागात अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण जाहीर झाले हे देखील नमूद करण्यात आले आहे.

हि यादी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाल्यानंतर सदर यादी बघून सुरवातीला अनेक इच्छुकांच्या पायाखालची वाळू सरकली. पुरुष गटातून निवडणूक लढविण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून तयारी करणाऱ्या प्रभागात महिला आरक्षण दिसले तर अनुसूचित जाती जागेवर जमाती असे यादीत नमूद केलेले असल्याने सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती जमाती गटातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या छातीत काही काळ धडकी भरली होती. सदर यादीबाबत अनेकांनी तात्काळ महापालिका कार्यालयात, तर कोणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरक्षण यादी खरोखर जाहीर करण्यात आली आहे का याची खातरजमा केली असता सदर आरक्षण यादी फेक असल्याचे समोर आले.