वाघांबा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

बागलाण तालुक्यातील वाघांबा शासकीय आश्रमशाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृतदेह वाघांबा साल्हेर घाटात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या विद्यार्थ्यांचा चिकार डोंगररावरून पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. रोशन दगडू शिंदे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

वाघंबा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दहावीत शिक्षण घेत असलेला रोशन शिंदे मंगळवार (ता. ६) पासून शाळेतून बेपत्ता होता. याच शाळेत रोशनची लहान बहीण खुशाली, भाऊ धनराज शिक्षण घेतात. मात्र, ते आठ दिवसांपूर्वी आपल्या गावी साल्हेर-तुपविहीरपाडा येथे गेले होते. बरेच दिवस झाल्यामुळे वडील दगडू शिंदे हे खुशाली व धनराज यांना घेऊन मंगळवारी (ता. ८) वाघंबा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत सोडण्यासाठी गेले. त्या वेळी त्यांनी शिक्षकांकडे मुलगा रोशनची चौकशी केली; परंतु रोशन शाळेत नसल्याची माहिती शिक्षकांनी दिल्यानंतर दगडू शिंदे यांनी नातेवाइकांकडे शोधाशोध केली. मात्र, कुठेच शोध लागला नाही.

साल्हेर किल्ला, टक्कार डोंगर आदी परिसरात शोध घेतला. शेवटी मगरबारा, चिकार कड्याखाली बघायला सुरवात केल्यानंतर झाडाझुडपांमध्ये रोशनचा मृतदेह आढळून आला. याबाबत जायखेडा पोलिसांना कळविण्यात आले. मात्र, घटनास्थळ गुजरातच्या सीमेवर असल्याने आहवा-डांग पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आला. विच्छेदनासाठी मृतदेह आहवा-डांग शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलिस हवालदार राजेंद्र वाघ, टी. एस. जगताप, आर. ई. भामरे, पी. पी. भारंबाळ तपास करीत आहेत.