अंबड औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात; ड्रायव्हरचा मृत्यू

नवीन नाशिक | प्रतिनिधी

अंबड औद्योगिक वसाहतीत एक्स-लो पॉईंट येथे एका आयशरवरील चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गाडी रस्त्याच्या कडेला असलेले शेड तोडून शेतात शिरली. या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ( दि. ८) सकाळी सहा वाजेच्या सुमारास गरवारे पॉईंट कडून एक्स लो पॉईंटच्या दिशेने आयशर ट्रक (एम एच १५ सिटी १८२२) जात होता. आयशरचा चालक राहुल राम ईकबाल (३०, रा.दत्त नगर चुंचाळे,नाशिक) याचा एक्स लो पॉइंटजवळ गाडी आली असताना गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी गाडी समोरील टेम्पो स्टॅन्ड समोरील शेड तोडून थेट शेतात शिरली. गाडीचा वेग अधिक असल्याने या अपघातात चालक राहुल याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शांताराम शेळके करीत आहेत.