नाशिक । प्रतिनिधी
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढून गेल्या आहेत, त्यामुळे आता नागरिकांचा इलेक्ट्रिक व्हेईकलकडे कल वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता नाशिक शहरातील विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
सध्या देशभरात पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागरिक इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदी करत आहेत. या वाहनांमुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढू लागले आहे. या दोन्हीही प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी ई-वाहनांना चालना देण्याचे धोरण नाशिक शहरात राबविले जाणार असून यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. नाशिक शहरात देखील इलेक्ट्रिक व्हेईकल चा वापर वाढतो आहे. इलेक्ट्रीक वाहनांचा वापर सातत्याने वाढत असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशनची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे शहरात महापालिकेच्या जागांसह खासगी जागांवर इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरु असून लवकरच शहरातील विविध ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.
तसेच इलेक्ट्रिक व्हेईकलबरोबर सीएनजी वाहनांचा वापर वाढतो आहे. मात्र त्या प्रमाणात सीएनजी स्टेशन नसल्याने पंपावर गर्दी होते. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनावर अधिक भर देण्यात येत आहे. येत्या काळात नाशिक शहरात मोठया प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर वाढणार आहे. त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणे गरजचे असून स्टेशन वाढले तर इलेक्ट्रिक व्हेईकल वापरात वाढ होईल. परिणामी नाशिक प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येईल अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.
यासाठी मनपा प्रशासन नगररचना विभागाकडून शहरातील महत्वाच्या ठिकाणांची माहिती संकलित करीत आहे. तसेच या प्रक्रियेवर बैठका घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. साधारण शहरातील नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसर, सिन्नर फाटा, द्वारका, पंचवटी तपोवन परिसर, मुंबई नाका, त्र्यंबक नका, गोल्फ क्लब, सिटी लिंक कार्यालय, पाथर्डी फाटा, गंगापूर नाका, सातपूर बसस्थानक आदी महत्वाची ठिकाणे चार्जिंग स्टेशनसाठी प्रस्तावित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील २५ ते ३० जागांवर हे स्टेशन उभारण्यात येऊन इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
तर आगामी काळात इलेक्ट्रिक व्हेईकल वाढणार असल्याने शहरातील बांधकाम होत असलेल्या ठिकाणी विशेष चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल. यासाठी नवीन बांधकाम करताना २५ पेक्षा अधिक कुटुंब असतील तर त्यांना एक स्टेशन, तर ५१ पेक्षा अधिक कुटूंबे असणाऱ्या सोयायटीत दोन चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे.