वावी । प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील घोटेवाडी येथे अज्ञात रोगाने एकाच दिवशी ११ जनावरे दगावल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि.०२) रात्रीच्या सुमारास या जनावरांनी माना टाकल्याने दोन सख्ख्या भावांचे सुमारे १० ते १२ लाखावर नुकसान झाले आहे.
घोटेवाडी येथील जालिंदर शिवलाल सरोदे (३७) आणि रवींद्र शिवलाल सरोदे (३९) या दोन भावांकडे दुभती जनावरे आहेत. यातील11 जनावरांना लाळ्या खुरकूत सदृश्य आजार असल्याचे समजून त्यांनी उपचार केले. त्यानंतर अचानक जास्त ताप येऊन या जनावरांचा अचानक गोठ्यात मृत्यू झाला. यात जालिंदर शिवलाल सरोदे यांच्या ३ तर रवींद्र शिवलाल सरोदे यांचे ०८ गाई होत्या.
दरम्यान, येथील वावी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश पवार यांना शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती देत घटनास्थळी जात पंचनामा केला. तालुका पशुचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अजय थोरात आणि डॉ. अविनाश पवार यांनी मयत जनावरांचे जागेवर शवविच्छेदन केले. त्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
दरम्यान, नाशिक विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तेथे अज्ञात आजाराची उकल न झाल्यास ते पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहे यावेळी या रोगाचे निदान तात्काळ करावे अशी मागणी यशवंतराव पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बापु घोटेकर, साईनाथ सरोदे, गोरख घोटेकर, संतोष घोटेकर यांनी केली आहे.