Video : राऊत, भुजबळ एकत्र आले तरी नाशिकमध्ये भाजपाच ‘किंग’

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये कितीही आटापिटा करा, संजय राऊत येउद्या नाहीतर भुजबळ येऊ द्या किंवा हे दोघेही आले तरी नाशिकच्या महापालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असा ठाम विश्वास संकट मोचक गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक निवडणूक प्रभारी पद बहाल केल्यानंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये आगमन झाले आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आगामी निवडणुकांवर भाजपचा पगडा राहणार असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले कि, माझ्याकडे प्रभारी पद आले असून येत्या निवडणुकांमध्येही भाजपाची सरशी असणार आहे. आता नाशिकची जवाबदारी माझ्याकडे असून जयकुमार रावल देखील माझ्यासोबत आहेत. शिवाय महापालिकेच्या वतीने नाशिकमध्ये चांगलं काम असल्याने भाजपाला पुन्हा नाशिकमध्ये पूर्ण बहुमत मिळणार असल्याचे सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=g8VaOHu45x8

ते पुढे म्हणाले कि, नाशिक निवडणूक आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मागच्या निवडणुकीत भाजपने चांगलं काम केल्याने बहुमत मिळाले होते. आता पुन्हा येत्या निवडणुकांत भाजप स्पष्ट बहुमत मिळवणार आहे. त्यामुळे कुणीही एकत्र आले तरी भाजपचा विजय निश्चित असणार आहे. मग संजय राऊत आणि भुजबळ एकत्र आले तरी भाजपचा विजय अटळ असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी महाजनांनी अनेक मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. यामध्ये संजय राऊत, राज्यपाल, ओबीसी आरक्षण, नवाब मलिक, फोन टँपिंग आदी विषयांवर त्यांनी उत्तर दिले. नवाब मलिक यांच्यावर बोलताना ते म्हणाले कि, नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, ही आमची मागणी आहे कारण दाऊद चे हस्तक यांच्याकडून नगण्य किमतीत प्रॉपर्टी घेतली आहे, हसीना पारकर यांना पैसे दिले आहेत, तरीही राज्यसरकार त्यांना देशभक्त म्हणत असेल तर काय बोलणार, असा उद्विग्न सवाल त्यांनी यावेळी केला.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) भाजपने (BJP) प्रभारी पदाची जबाबदारी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सोपवली. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिवसेनेकडून स्वतः संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेत लक्ष घातले आहे.