किर्तनकार ते पीएसआय, व्हाया इंजिनिअर, सिन्नरच्या रुपालीचा अफलातून प्रवास!

नाशिक । प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील दोडी येथील रुपाली केदार हिने यशाला गवसणी घातली आहे. एकीकडे टाळ मृदुगांच्या गजर, अन दुसरीकडे मिणमिणत्या दिव्यात अभ्यास असा थक्क करणारा प्रवास रुपाली यांनी पार करून पीएसआय पदावर विराजमान झाल्या आहेत.

रुपाली केदार या मूळच्या सिन्नर तालुक्यातील दोडी गावच्या. सुरवातीचे शिक्षण जिल्हा परिषदेत झाल्यानंतर आईवडिलांनी तिला तिचे चुलते मनोहर केदार यांच्याकडे आळंदीला पाठवले.. त्यामुळे आई-वडिलांच्या इच्छेनुसार रूपालीने चौथीपासून आळंदीत अध्यात्म शिक्षणासोबत (Education) शाळा सुरू केली.पुढे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याकडे ओझरला काही काळ अध्यात्माचे धडे गिरवले. रुपाली यांची इयत्ता सातवीपासूनच बालकीर्तनकार ही ओळख निर्माण केली. अध्यात्माच्या शिक्षणासोबतच रूपालीने अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने ‘एमपीएससी’ची तयारी केली. आज त्यातही तिने यश मिळवले असून, तिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

रुपाली केदार यांनी सुरवातीला २०१८ मध्ये ‘एमपीएससी’ची पहिली पूर्वपरीक्षा दिली. मात्र या परीक्षेत अपयश आले. आणि त्याच वर्षी त्यांचे लग्नही झाले. मात्र यातून खचून जाता तिने सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले. मुंबईत पोलीस असणाऱ्या काकांकडून रुपालीने स्पर्धा परीक्षेचे धडे गिरवले. संसारातून वेळ काढत अभ्यास अन कीर्तन दोन्ही चालू ठेवले. विशेष म्हणजे तिचे पती नितीन यांनीही तिला पूर्ण पाठिंबा दिला. या जोरावरच तिने २०१९ मध्ये झालेल्या पूर्व आणि नंतर मुख्य परीक्षेत बाजी मारली.

रुपाली केदार यांनी कीर्तनामुळे आत्मविश्वास, लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात होतेच. याचाच फायदा त्यांना पीएसआयच्या मुलाखतीला झाला.अन त्यांची ‘पीएसआय’ म्हणून निवड झाली. रुपालीच्या या यशाचे तिचे शेतकरी आई-वडील आणि मित्र परिवाराला अपार कौतुक आहे.