अखेर टीईटी घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे निलंबित

नाशिक । प्रतिनिधी

शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Exam scam ) गैरकारभार केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe suspended) यांना शिक्षण विभागाने (Education Board) निलंबित केले आहे. यासाठी आज त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुपे यांचे हे निलंबन त्यांच्या अटकेच्या दिनांकापासून असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागाने सुपे यांच्या निलंबनाचा काढलेला हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही.

निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुपे यांच्याकडे लाखो रुपयांची रोकड आणि टीईटी परीक्षेसंदर्भातील अनेक कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यामुळे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना १६.डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून ४८ तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत.