Home » नाशिककर ! २०२४ पर्यत प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळणार

नाशिककर ! २०२४ पर्यत प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळणार

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल अंतर्गत प्रति दिन, प्रति माणसी 55 लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष असून 2024 पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी अभियान स्वरुपात काम करण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी केले.

नाशिक प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ व ‘स्वच्छ भारत मिशन’ व अटल भूजल या योजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त सी.डी. जोशी , पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन यांच्यासह पाचही जिल्हयातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना संजीव जयस्वाल यांनी जलजीवन अभियान हे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात विशेषत: महिलांच्या जीवनात सुलभता निर्माण करणारे असून या अभियानास लोक चळवळ बनविण्याचे आवाहन केले. जलजीवन मिशन अंतर्गत ‘९० दिवस मोहिम ‘ राबविण्यात येणार असून सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी अभियान स्वरुपात काम करावे, तसेच रेट्रोफिटिंग व नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देशही पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी दिले.

यावेळी जलजीवन मिशन तसेच स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा 2, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागात नियोजनपुर्वक काम करुन विभागातील सर्व जिल्हयात उददीष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. बैठकीस उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी, तसेच पाचही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग , कार्यकारी अभियंता (मजिप्रा) वरिष्ठ भुवैज्ञानिक आदि बैठकीस उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!