मोठी बातमी..! मंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात शेतकरी आक्रमक

मंत्री दादा भुसे यांच्या धुळे दौऱ्यात शेतकरी आक्रमक झाले. दादा भुसे यांच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात आली. धुळ्याच्या साक्री येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाले असून पाहिजे तशी मदत मिळाली नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी संतप्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी आपल्या आक्रमक पवित्र्यावर ठाम होते.

सरकार स्थापन झाल्याच्या नंतर अजूनही शेतकऱ्यांना हवी तशी मदत मिळाली नाही. कांद्यासारख्या पिकाला कवडीमोल भाव देखील नाही. अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे झालेले नाही. तर ज्या ठिकाणी पंचनामे झाले आहेत त्या शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळाला नाही. त्यामुळेच संतप्त शेतकरी अशा प्रकारे शिंदे-भाजप सरकारवर रोष काढत असून धुळे जिल्ह्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या शासन जबाबदार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच अशा प्रकारे दादा भुसे यांच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांचा रोष निघत असल्याचं म्हंटलं जातं आहे.

आसमानी संकट अन् रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार

शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची तर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राज्याचा गाडा अडकून पडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांवर आसमानी संकट गडद होतं. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली होती. राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस सुरू होता. सात ते आठ लाख हेक्‍टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. तर चार हजार हेक्टर जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेली होती. मात्र या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष देण्यास कृषी मंत्री नसल्याने शेतकऱ्यांचा प्रचंड संताप झाला होता.

शिंदे-भाजप स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तारासाठी फक्त ‘तारीख पे तारीख’ समोर येत होती. अशात आधीच आसमानी संकट आणि त्यात मदतही नाही अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. अखेर सत्ता स्थापनेच्या ४० दिवसांनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र हवी तशी मदत मिळाली नसल्यानं धुळे येथील शेतकऱ्यांचा प्रचंड संताप झाला आणि त्यांनी दादा भुसे यांच्या दौऱ्या वेळी आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती आहे.