नाशिक । प्रतिनिधी
कोट्यवधींच्या प्रॉपर्टीच्या लोभातून एकाने मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (वय ७०) व त्यांचा एमबीबीएस असलेला मुलगा डॉ. अमित (वय ३५) या दोघा बाप-लेकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघडकीस आली. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी राहुल गौतम जगताप (३६, रा. आनंद गोपाळ पार्क) यास बुधवारी (दि.१६) पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी दुहेरी खून प्रकरणासंदर्भात बुधवारी (ता. १६) माहिती दिली. ते म्हणाले कि, शरणपूर रोडवरील जुन्या पंडित कॉलनीमध्ये राहणारे कापडणीस पिता-पुत्र हे मागील काही वर्षांपासून एकटेच राहत होते. पत्नी व मुलगी नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. अमित कापडणीस याने एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले असून, तो कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सराव करत नव्हता. दोघेही पिता-पुत्र एकाकी जीवन जगत होते.
याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांच्याच आनंद गोपाळ पार्क नावाच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राहुल याने त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवून अमितसोबत मैत्री केली. मैत्रीतून त्याने त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेविषयी तसेच बँक, शेअर मार्केट, डिमेट खात्यातील गुंतवणूकविषयीची माहिती जाणून घेतली. गडगंज संपत्ती असल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल याने थंड डोक्याने कापडणीस पिता-पुत्रांच्या हत्येचा कट रचल्याने पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.१६) सांगितले.
दरम्यान राहुल जगताप याने त्यांचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील जव्हार-आंबोलीदरम्यान जाळून त्या भागातील दरीत फेकून दिला. त्यानंतर दहा दिवसांनंतर २६ ते २७ डिसेंबरच्या दरम्यान त्यांचा मुलगा डॉ. अमित याचा खून करून त्यांचाही मृतदेह जाळून मृतदेह राजूर (नगर) जिल्ह्यात निर्जन भागात फेकून दोन्ही खुनांचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.