शहीद प्रसाद क्षीरसागर यांचे पार्थिव दिंडोरीत दाखल

नाशिक । प्रतिनिधी
अरुणाचल प्रदेशमध्ये देशाच्या संरक्षणार्थ सेवा बजावत असताना दिंडोरीतील प्रसाद कैलास क्षीरसागर या सैन्य दलातील जवानास सोमवारी (दि.१४) अपघाती वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज दिंडोरी येथील उमराळे येथे दाखल झाले असून थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत असणारे क्षीरसागर हे सैनिकी कॅम्प साठी सैनिकी ट्रक मधून सेवेच्या ठिकाणी जात असताना ट्रक दरीत कोसळला. या अपघातात त्यांना वीरमरण आले. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांचे पार्थिव दिंडोरीत दाखल झाले.

दरम्यान त्यांचे पार्थिव दिंडोरीत दाखल झाल्यानंतर कुटुंबियांसह गावकऱ्यांनी टाहो फोडला. यावेळी अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांचे पश्चात आई वडील बहीण व भाऊ असा परिवार असून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांचेवर होती. जानेवारीत ते सुट्टीवर आलेले होते. सुट्टी संपून ३० जानेवारीला ते दिंडोरीतून अरुणाचल प्रदेश मध्ये आपल्या सेवेसाठी रुजू होण्यासाठी रवाना झाले होते.