राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला मांडणार

मुंबई | प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात राज्याचा सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी मांडला जाईल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे ठिकाण तसेच कालावधी निश्चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची आज बैठक विधानभवनात झाली या बैठकीत अधिवेशनाचा २२ दिवसांचा कालावधी ठरविण्यात आला. प्रलंबीत बिले आणि मागण्यांवर पाच दिवस चर्चा होणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित होते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

अधिवेशन मुंबईतच
दोन्ही सभागृहातील सदस्य संख्या पाहता नागपुरात बैठक व्यवस्था नसल्याने मुंबईत हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विदर्भावर अन्याय होणार नाही. आज संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याचे अनिल परब म्हणाले.

कोरोना चाचणी अनिवार्य
कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर हे अधिवेशन होणार असले तरी अधिवेशनात प्रवेशासाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रवेशासाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.