अखेर आईचंच काळीज ते.. ती आली अन पिल्लांना घेऊन गेली..!

नाशिक । प्रतिनिधी
भरकटलेल्या बछड्यांची त्यांच्या आईसोबत भेट घालून देण्यात अनेकदा वन विभागाला यश आले आहे. अशातच पुन्हा एकदा त्र्यंबक तालुक्यातील तळवाडे याठिकाणी वन विभागाने मादी आणि तिच्या पिल्लांची भेट घडवून आणल्याची घटना समोर आली आहे.

बिबट्या या वन्य प्राण्याला लपण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा हे उसाचे शेत असते. आपल्या बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी एका उसाच्या शेतात आढळून आलेल्या तीन बछड्यांची त्यांच्या आईशी भेट घडवून आणण्यात वन विभागाला यश आले आहे. सोमवारी त्र्यंबक तालुक्यातील तळवाडे येथील बंडू आहेर यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले होते. आहेर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी याबाबत तातडीने वन विभागाला कळवले.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग तसेच वन्यप्राणी रेस्क्यु टीम घटनास्थळी दाखल झाली होती. बछड्यांची आई व्याकूळ होईल, बिबट्या हिंसक होऊन जवळील नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेता वनविभागाने या बछड्यांची त्यांच्या आईसोबत भेट घालून देण्याचा निर्णय घेतला.यांनतर त्या ठिकाणी कॅमेरे लावून बिबट्याचे बछडे त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. सायंकाळी सहाच्या सुमारास ही मोहीम सुरु झाल्यानंतर काही तासांनी पिलांच्या शोधात आलेली मादी आपल्या बछड्यांना घेऊन निघून गेल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

यावेळी आपल्या पिलांच्या शोधात व्याकूळ झालेल्या मादीने पिलांना घेऊन गेल्यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. वनविभागाच्या या कामगिरीचे संपूर्ण गावकऱ्यांनी कौतुक केले. मात्र सुरवातीला बिबट्याच्या बछड्याना पाहून गावकरी भयभीत झाले होते. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना योग्य ते मागदर्शन करत त्यांची भीती घालवली. त्याचप्रमाणे बिबट्या निघून गेला असल्याने काळजी करण्याचे कारण नाही, मात्र सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.