नाशिक । प्रतिनिधी
नाशिकच्या (Nashik) स्मशानभूमीत लोककवी विनायक दादा पठारे (Vinayak Dada Pathare) यांच्या अंत्यविधीसाठी (funeral) जमलेल्या सर्व लोकांसमोरच दोन राजकीय गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची निंदनीय घटना घडली आहे.
नाशिकचे लोककवी विनायक दादा पठारे यांचे नुकतेच निधन झाले. मंगळवारी (दि. २८) आगरटाकळीजवळ गोदाकाठी (Godavari River) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला अनेक लोक उपस्थित होते. यावेळी चिता शांत होत असताना उपस्थित दोन राजकिय गटात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामुळे एकीकडे पठारे यांची चिता जळत असताना दुसरीकडे आपसातील वैमनस्यापोटी शांतता भंग करीत स्मशानभूमीत वाद केले. यावेळी उपस्थित सर्वांचे मन या घटनेमुळे विषण्ण झाले.
दरम्यान प्रकरणी भद्रकाली पोलिसांत (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत माजी महापौर (Mayor) अशोक दिवे (Ashok Dive) आणि त्यांच्या दोन नगरसेवक मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दिवे आणि गांगुर्डे गटाकडून परस्परांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र लोककवीच्या अंत्यविधी दरम्यान हाणामारी करणाऱ्या नेत्यांचा शहरभरात तीव्र निषेध केला जात आहे.
एकीकडे लोक कवी, लोककलाकार आपल्या कलेतून लिखाणातून समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्यातलेच एक लोककवी म्हणजेच विनायक दादा पठारे. त्यांनी विविध लोकगीते लिहिली. त्यातलं एक म्हणजे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे आणि त्यानंतर कारभारी दमानं यासारखी सुपरहिट गीते लिहली आहेत.