भगूर परिसरात अवैध मद्यसाठा जप्त, एक जण ताब्यात

नाशिक । प्रतिनिधी
दादरा व नगरहवेली केंद्रशासित प्रदेशामध्ये निर्मित मद्यसाठा राज्यात प्रतिबंधित असताना शहरातील भगूर परिसरात साडेपाच लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

याबाबत उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, नाशिकच्या भगूर परिसरात केंद्रशासित प्रदेशात वैध असलेली मात्र महाराष्ट्रात अवैध असलेल्या मद्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार राज्य उत्पादन शुक्ल नाशिकच्या पथकांने सापळा रचला. त्यानुसार भगूर येथे माहिती मिळालेल्या ठिकाणी एका घरावर छापा टाकला असता याठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला दमण येथे तयार होणारे मद्य हे आढळून आले.

यावेळी मद्याच्या बॉटलवर महाराष्ट्रात विक्रीसाठी परवानगी असलेले डुप्लिकेट स्टिकर लावण्याचे काम सुरू होते. पथकाने यशस्वीरीत्या कारवाईचे करत जवळ जवळ साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या पथकाने जप्त केला आहे. यात एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक अधीक्षक मनोहर अंचुले यांनी दिली आहे.