सातपूर येथील दहा वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणी पाच जणांना जन्मठे

नाशिक । प्रतिनिधी
सातपूर परिसरातील एका हॉटेलात धक्का लागल्याच्या कारणावरून लोखंडी हत्याराने वार करून खून करणाऱ्या पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी शनिवारी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सदरचा गुन्हा नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सातपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (दि. ०७ डिसेंबर २०११) रोजी हॉटेल सोनाली गार्डन समोर, त्र्यंबक रोड नाशिक येथे घडलेला आहे. सदर गुन्हयातील मयत राहूल भास्कर शेजवळ व त्याचे मित्र हॉटेल सोनाली गार्डन मध्ये पार्टीसाठी गेले होते. यावेळी जेवण करून बाहेर आल्यानंतर गुन्हयातील संशयित आरोपी राकेश मधुकर जाधव व त्यांचे मित्र येत असताना धक्का लागला. यावेळी राकेश व राहुल यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

यांनतर लागलीच राकेश याने त्याच्या मित्रांना बोलवून घेतले. यावेळी धक्का लागल्याचे कारणावरुन कुरापत काढून राहुलच्या डोक्यात लोखंडी गजाने पाठीवर चाकू सारख्या हत्याराने वार केले. मात्र रक्तश्राव अधिक झाल्याने उपचारादरम्यानच राहुलचा मृत्यू झाला होता. या घटने दरम्यान राकेश मधुकर जाधव(वय २९), शरद उर्फ दिगंबर बबन नागरे (वय २५), अनिरुध्द धोंडू शिंदे (वय २२), लक्ष्मण छबु गुंबाडे उर्फ बादशहा (वय २६), दिपक भास्कर भालेराव (वय २६) सर्व रापिंपळगांव बहुला, त्र्यंबकरोड नाशिक यांचा समावेश होता. म्हणून संशयित आरोपीविरूध्द सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक, के.आर.पोपेरे तत्कालीन नेमणूक सातपुर पोलीस ठाणे नाशिक शहर, यांनी केलेला असून त्यांनी आरोपीविरूध्द् सबळ पुरावे गोळा करून आरोपींविरूध्द् मा. जिल्हा व सत्र न्यायालय, नाषिक येथे दोशारोपपत्र दाखल केले होते, सदर खटल्याची सुनावणी मा. प्रमुख
जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक येथे सुरू होती. त्यानुसार आज या पाचही आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.