उद्या एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर.. पंतप्रधानांची घोषणा

By चैतन्य गायकवाड

नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे (former PM Shinzo Abe) यांच्यावर भाषण करताना गोळ्या झाडल्याची घटना घडली. शिंजो ॲबे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. तसेच त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शिंजो ॲबे हे भारताचे जवळचे मित्र होते. त्यामुळेच जपानचे माजी पंतप्रधान असलेल्या शिंजो ॲबे यांच्या प्रती आदर तसेच दुःख व्यक्त करण्यासाठी भारतात उद्या (दि. ९) रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा (one day national mourning) जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याबाबत घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो ॲबे यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांच्या प्रती आपण मनापासून आदरभाव व्यक्त करत आहोत, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी पुढे म्हटले आहे, “मित्र शिंजो ॲबे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने खूप दुःखी झालो आहे. आमचे विचार आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहे. शिवाय आम्ही त्यांचे कुटुंबीय आणि जपानच्या लोकांसोबतही आहोत.” असं नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. तसेच या दुःखद घटनेवर पंतप्रधान मोदींसोबत जगातील विविध राष्ट्रांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पश्चिम जपानमधील नारा (Nara) या शहरात भाषण करत असताना माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्याने शिंजो ॲबे यांना रक्तस्त्राव झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या संदर्भात जपानमधील एका वृत्तसंस्थेने (news agency) माहिती दिली आहे. दरम्यान, शिंजो ॲबे यांच्यावर गोळीबार कुणी केला व का केला याबाबत तपास सुरु आहे. शिंजो ॲबे हे जपानचे माजी पंतप्रधान असून, त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान पदाचा राजीनामा (resigned as PM) दिला होता. प्रकृती अस्वस्थतेमुळे शिंजो ॲबे यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. शिंजो ॲबे हे दीर्घकाळ जपानचे पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. त्यांनी जपानच्या पंतप्रधान पदाची धुरा जवळपास आठ वर्षे सांभाळली. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात ते भारत दौऱ्यावर देखील आले होते.