हम नही सुधरेंगे! नंदिनी नदी मोकळा श्वास घेणार कधी?

नाशिक । प्रतिनिधी

नंदिनी नदीला जोडणाऱ्या कामटवाडे ते शिवशक्ती येते नाल्यात मुदत संपलेली औषधे आढळून आले आहेत. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार समोर आले असून या प्रकरणी संबंधित प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गोदावरी नदीची मुख्य उपनदी असलेल्या नंदिनी नदीच्या पात्रात कचऱ्याची भर पडत असून, उंटवाडी येथील दोंदे पूलावरून घनकचरा नदीपात्रात टाकला जात असल्याचे वास्तव आहे. कचऱ्यामुळे नदीपात्राची रूंदी कमी होत असून, सांडपाणी मिसळणे अजूनही सुरूच असल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘नंदिनी वाचवा, पर्यावरण वाचवा, असा संदेश वारंवार दिला जात असला तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिडको सर्व परिसरातील नंदिनी नदीला जोडणारा नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा तसेच औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. आताही मुदत संपलेली औषधें, गोळ्या सलाईन सापडले आहेत, मात्र या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.

त्यातच दोन दिवसापूर्वी नंदिनीला जोडणाऱ्या कामतवाडे तें शिवशक्ती नगर येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे, गोळ्या, सलाईन, इंजेक्शन आढळून आले आहेत. याबाबत पर्यावरणप्रेमी अमित कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर महापालिकेने कर्मचारी पाठवून येथील स्वच्छता केली. नदीमध्ये अशाप्रकारे औषधे टाकली जात असतील तर त्यामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.