योगी, महाराजांची जागा मंदिर-मठात, राजकारणात नाही!

नाशिक । प्रतिनिधी

योगी आणि महाराजांची जागा मंदिर आणि मठात आहे. राजकारणात नाही, अशा शब्दात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी टीका केली आहे. योगी आणि महाराजांची (Yogi and Maharaj)जागा मठात असून ते जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हा देशाचं वाटोळं झालं, अशी झणझणीत टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

सोलापुरातील कॉंग्रेसच्या विजय संकल्प मेळाव्यात प्रणिती शिंदे यांनी ही टीका केली. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, योगी आणि महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे, पण जेव्हा योगी-महाराज राजकारणात येतात, तेव्हा देशाचं वाटोळे सुरु होते. लोकशाही टिकवायची असेल तर कामाला महत्व द्या, संविधान जिवंत ठेवायचे असेल, तर कामाला महत्त्व दिले पाहिजे, असे सांगत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कधीही जात-पात केली नाही. तुम्ही त्यांना निवडून दिले. कारण ते कामाला प्राधान्य द्यायचे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

https://youtu.be/C-iEdlO3Wek

यावेळी प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप सरकारचा समाचार घेत कृषी कायद्यासह अन्य मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशची निवडणूक आल्यामुळेच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यात आले, याचा पुनरुच्चार करत, वर्षभर शेतकऱ्यांनी लढा दिला, ७०० शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेतला आणि मग कायदे रद्द केले, याबद्दल लाज वाटायला हवी, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले असून प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्री देशपांडे महाराज, म्हणाले कि ‘महाराष्ट्र ही संत भूमी आहे, हे विसरु नका ताई, साधू संतांनी, योगी महाराजांनी समाज सुधारणेचे मोठे काम केले आहे व आजही अविरत चालु आहे. प्रणीतीताई शिंदे यांनी लवकरात लवकर देशातील जनतेची जाहीर माफी मागावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

तर सोलापुरातील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे प्रणिती शिंदे यांना टोला लगावला आहे. त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे कि, ‘ताई, तशा प्रत्येकाच्या जागा आम्ही सांगितल्या तर तुम्हाला चालतील का? असा सवाल त्याने या पोस्टद्वारे प्रणिती शिंदेंना विचारला आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेच्या या वक्तव्यानंतर आता भाजप नेते काय भूमिक घेतात याकडे लक्ष लागले आहे.