नाशिक । प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका व शहरातील नागरिक , सामाजिक संस्था यांच्या मदतीने नायलॉन मांजा बाबत सलग दोन वर्षापासून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
नायलॉन मांजा विक्रीवर न्यायालयाची बंदी आहे. या मांजामुळे शहरात अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांचा गळा कापल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकारच्या अपघातांमधून येणारे कायमस्वरुपी अपंगत्व येण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्याचप्रमाणे हा मांजा पक्ष्यांना, प्राण्यांना जखमी करण्यासही कारणीभूत ठरतो. अनेकवेळा यात अडकून मुके प्राणी आणि पक्षी मृत्युमुखी पडतात.
या मांजाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे तरीही छुप्या पद्धतीने शहरात मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची विक्री होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईसोबतच नागरिकांचे आणि खासकरून तरुण पिढी आणि लहान मुलांचे प्रबोधन होण्याची गरज आहे. याच विचारातून नाशिक शहरातील पर्यावरणप्रेमी चंद्रकिशोर पाटील यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने नो नायलॉन मांजा या अभियानाला नाशिक शहरात सुरवात केली आहे.
यासाठी त्यांनी पतंगाची शिल्पाकृती बनवली आहे. त्यावर नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे आणि पक्ष्यांचे फोटो वापरले आहेत. हे शिल्प नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या अभियानाअंतर्गत श्री पाटील आणि त्यांचे सहकारी शहरातील विविध चौक आणि महत्वाच्या सिग्नलवर जनजागृती करत आहेत. दि. ११ जाने अभियानाच्या दुसऱ्या दिवशी सिटी सेंटर मॉलजवळील सिग्नलवर शिल्पकृती आणि पोस्टर्स घेऊन जनजागृती केली आणि नागरिकांशी संवाद साधला. त्याचवेळी दोनच महिन्यापूर्वी मांजामुळे गळा कापून जखमी झालेले नागरिक आनंद सोनावणे यांनी टीमला भेट देऊन या अभियानासाठी आभार मानले.
या मोहिमेत तिडके नगर येथील जेष्ठ नागरिक अनंत सगंमनेरकर,सुरेश नाफडे,नरेंद्र दशपुते, माधुरी गडाख (भोसला स्कुल शिक्षिका), इत्यादी सहभागी होते.