जिल्ह्यातील जिप शाळांत गिव्हने बांधली ९२ ‘टॉयलेट्स’

नाशिक । प्रतिनिधी

एकीकडे हागणदारी गाव मुक्त योजनेचे तीन तेरा वाजले असताना गिव्ह संस्थेच्या माध्यमातून आतापर्यत जिल्हा परिषदेच्या ४० शाळांवर ९२ शौचालये उभारण्याचे काम या संस्थेने केले आहे.

गिव्ह वेलफेयर ऑर्गनाझेशन ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक हितासाठी काम करते आहे. दरम्यान जिल्हयातील जिल्हा परिषद शाळांना ते शौचालय पुरविण्याचे काम हाती घेतले आहे. आता पर्यंत या संस्थेने ९२ टॉयलेट्सची उभारणी केली आहे. दर महिन्याला १० टॉयलेट्सचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ही संस्था काम करते. यामध्ये प्राथमिक शाळेत ०२ शौचालये, तर माध्यमिक शाळेत ४ शौचालयांची उभारणी केली जाते.

नुकतेच गिव्हच्या माध्यमातुन त्र्यंबक येथील ब्रम्हगीरीवर चार शौचालयांची उभारणी करण्यात आली.अलीकडच्या काळात येथील पर्यटन विकास मोठा झाला मात्र अद्यापही पर्यटकांच्या दृष्टीने या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही. याच पार्श्वभूमीवर गिव्हने येथील परिसरात दोन शौचालयांची उभारणी केली आहे. त्यामुळे ब्रम्हगिरीवर येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळणार आहे.

तसेच त्र्यंबक येथील मेटघर किल्ला, सुपल्याची मेट येथील शाळांवर प्रत्येकी २-२ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच अनेक वाचनालयांत देखील हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये हरसूल वाचनालयात ०४, ठाणापाडा येथे ०२ अशी उभारणी करण्यात आली आहे. सदर शौचालयासाठी ४० हजार रुपये इतका खर्च येत असल्याचे गिव्हचे अय्यर यांनी सांगितले. ते म्हणालेकी यासाठी आमची टीम स्वतः या शौचालयाचे बांधकाम त्या जागेवर करीत असते. ज्या शाळांना पाण्याची सोया असेल तेथे आम्ही हि शौचालये प्रदान करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील काही वर्षांपासून अंबड असलेला सॅनिटरी पॅड वेडिंग मशीनचा उपक्रम पुन्हा एकदा सुरु करतो आहोत. लवकरच हा उपक्रम सर्वच ठिकाणी राबविण्यात येणार आहे. सुरवातीला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ही सुविधा करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. – रमेश अय्यर, गिव्ह संस्था