नाशकात महिलांचे सौभाग्याचे लेणं असुरक्षित

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात चैन स्नॅचिंगच्या घटना सुरूच असून नुकतीच उपनगर पोलिस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीची घटना समोर आली आहे.

अलका जाधव (वय ६३, रा. आनंद नगर) असे मंगळसूत्र चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे. जाधव या आपल्या अक्षरधारा बिल्डिंगच्या समोर उभ्या होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्यांपैकी एकाने जाधव यांच्या गळ्यातील २५ ग्रॅमचे मंगळसुत्र हिसकावले आणि पळ काढला.

दरम्यान घटनास्थळी पोलिसांचा पंचनामा सुरू असून पोलीस चोरट्यांचा तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढले असून यामुळे महिलांच्या सौभाग्याचे लेणं असुरक्षित होत आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांवर अद्याप अंकुश आणण्यामध्ये नाशिक पोलिसांना यश आलेले नसल्याचे या घटनांवरून दिसून येते.