जीव वाचवायला गेला,अन तोच जीवानिशी गेला !

मुंबई आग्रा महामार्गावर कसारा येथे कंटेनर आणि स्कॉर्पियो कारमध्ये झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.अपघात झाला त्यावेळी घाबरून उडी मारत असतांना तोल जाऊन खोल दरीत पडल्याने कंटेनर चालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.


नाशिक मुंबई महामार्गावर कसारा बायपास बंधाऱ्याजवळ कंटेनर क्रमांक एम.एच.४६.एच १०२५ च्या चालकाने पुढे चालणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीस जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कॉर्पिओ गाडी थांबली असता,कंटेनर चालकाने घाबरून कंटेनर मधून उडी घेतली ,उडी मारताना त्याचा अंदाज चुकला आणि तो थेट 40 फूट खोल दरीत जाऊन पडला.या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झालाय.अपघाताच्या घटनेमुळे येथून होणारी वाहतूक ठप्प झाली होती.आपत्ती व्यवस्थापन टीम ,रूट पेट्रोलिंग टीमने कसारा पोलीस व वाहतूक पोलिसांच्या मदतीने कंटेनर चालकाचा मृतदेह बाहेर काढत , कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.