नाशिक । प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथील हेमाड पंथी मंदिराची दुरावस्था झाल्याची माहिती शिवदुर्ग संवर्धन भ्रमंतीने संबंधित विभागाला दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने येथील परिस्थिती जैसे थे होती. अखेर शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेनेच पुढाकार घेऊन येथील मंदिराची स्वच्छता केली आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकमधील गड किल्ले संवर्धन करणारी संस्था शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती हि त्र्यंबक तालुक्यातील ठाणापाडा येथे गेली होती. येथील खैराई किल्ल्यावर चढाई केल्यानंतर त्यांनी परतीची वाट धरली. त्यावेळी येथील गावकऱ्यांनी हेमाड पंथी मंदिराची माहिती दिली. त्यावेळी येथील हेमाडपंथी तीन मंदिरांची प्रचंड दूरावस्था झाल्याचे दिसून आले होते. याबाबत त्यांनी पुरातत्व खात्याबरोबरच तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली होती.
दरम्यान अनेक दिवस उलटूनही तक्रारीवर काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. अखेर शिवदुर्ग संवर्धन भ्रमंतीने स्वतः पुढाकार घेत गावकऱ्यांना हाताशी घेतले. आणि येथील हेमाडपंथी मंदिरांना नवसंजीवनी दिली. येथे असणाऱ्या जैन, बौद्ध आणि हिंदूंची तीन मंदिरांना पुन्हा झळाळी देण्याचे काम या संस्थेने हाती घेतले आहे.
या मोहिमेमध्ये देवराम गावित, धोंडीबा महाले, महेंद्र गावित, शिवराज मिंदे अनिल दाते, संतोष मिंदे, शाम गव्हाणे अदी शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या मावळ्यांनी सहभाग घेतला.