लता मंगेशकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन, दर्शनासाठी नागरिकांची गर्दी

नाशिक । प्रतिनिधी
आज सकाळी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन रामकुंड येथे करण्यात आले. यावेळी मंगेशकर कुटुंबियांसह, नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी यावेळी धार्मिक विधी पार पाडला.

लता मंगेशकर यांचे दि. ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्कवर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. आज सकाळच्या सुमारास आशा भोसले, उषा मंंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मिलिंद नार्वेकर आदी मान्यवर रामकुंडावर दाखल झाले आहे. मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते लता मंगेशकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन करण्यात आले.

यावेळी नाशिकचे अधिकारी वर्ग, नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरवातीला असंख्य नाशिककरांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले. यावेळी रामकुंडावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान मालेगाव स्टँड, ढिकले वाचनालाय, खांदवे सभागृह, दुतोंडया मारुती व यशवंत महाराज पटांगणाकडून रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मंगेशकर कुटुंबिय आज गुरूवारी नाशिकमध्ये उपस्थित राहणार असल्याने त्यांना शासकीय विश्रामगृह आरक्षित करण्यात आले होते.