नाशकात गल्ली गँगचे पेव, सिडकोत गाड्या फोडल्या

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात नागरिकांच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले असून दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे.शहरातील सिडको परिसरात गाड्या आणि दुकान फोडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे.

शहरातील उत्तम नगर परिसरातील शुभम पार्क येथे ही घटना घडली. यावेळी तब्बल १० ते १२ जणांच्या टोळक्याने ही तोडफोड केल्याचे म्हटलं जात आहे. तर या घटनेत ४० ते ५० गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

या परिसरात दुपारी दोन गटात वाद झाला होता. यावेळी य दोन्ही गटात हाणामारी झाली होती. याचा बदला घेण्यासाठी तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड करण्यात आली असल्याचं समजते आहे.

तसेच दोन राजकीय गटातील वादातून ही घटना घडली असल्याची चर्चा परिसरात होती. महानगर पालिकेची निवडणुक जवळ आली असताना ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.