नाशिक | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार असल्याने सगळ्यांचे लक्ष सूनवणीकडे लागले आहे.
जवळपास दीड महिन्यापासून सुमारे साडे पाच हजार एसटी कर्मचारी विलीनीकरणा च्या मागणीसाठी संपावर आहेत. तद्नंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर न्यायालयाने नेमलेली त्रिसदस्यीय समिती प्राथमिक अहवाल आज न्यायालयात सादर करणार आहे. आजच्या सूनवणीनंतर सरकार मेस्मा लावण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महत्वाचे म्हणजे, समितीचा अहवालानंतर न्यायालयाचा निर्णय सरकारला मान्य असेल अशी भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी आधीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या अहवालात काय मुद्दे असतील आणि न्यायालय त्यावर काय निर्णय देईल याकडे राज्यभरातले एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचं लक्ष लागले आहे.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारशी भांडत आहेत. त्यामुळे सुनावणीपूर्वी मंत्री सुभाष देसाई आणि अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती आहे.