नाशिक । प्रतिनिधी
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत उद्या (दि. ०१) रोजी नाशकात आयटी कंपन्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. आयटी कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर सुमारे १०० हून अधिक आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभाग घेणार आहेत. या चर्चासत्राअंती काही आयटी कंपन्यांसमवेत करारही केला जाणार आहे, अशी माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली.
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून आडगाव शिवारात आयटी हब उभारण्याचा निर्णय घेतला असून यासाठी उद्या महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी उद्योगमंत्री नारायणे राणे हे देखील उपस्थित राहणार असून नाशिक बड्या कंपन्यांचा सहभाग या बैठकीस असणार आहे. आयटी हबसाठी महापालिका भूसंपादन करणार नाही तर भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून दिल्या जातील. आयटी हब विकासातून महापालिकेला प्रिमिअम शुल्कापोटी ३०० कोटींचा महसुल उपलब्ध होणार आहे, तर सुमारे दोन लाख युवकांना या आयटी हबमध्ये रोजगाराची संधी मिळणार असल्याची माहिती नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.
आयटी हबकरीता महापालिकेने स्वारस्य देकार मागविल्यानंतर ३३५ एकर क्षेत्राच्या जागामालकांनी भाडेतत्वावर जागा देण्यास लेखी संमती दर्शविली आहे. आयटी डेव्हलपरमार्फत आयटी हबची उभारणी केली जाणार असून जागा ३३ वर्षांच्या भाडेकरारावर आयटी कंपन्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यासाठी महापालिका आणि आयटी डेव्हलपर कंपनीसमवेत करार केला जाणार आहे. या डेव्हलपर कंपनीमार्फत आयटी कंपन्यांना भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून दिली जाईल. जागा मालकांना जागेचे भाडे दिले जाईल. केंद्र शासनाकडून आयटी हबमध्ये सुविधा केंद्र उभारण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचे राणे यांनी मान्य केले आहे.