नाशिकमधील आयटी पार्क संदर्भात महत्वाची बैठक, मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये ३०० एकर जागेवर उभारण्यात येणार्‍या आयटी पार्क संदर्भात केंद्रित उद्योग मंत्री नारायण राणे येत्या ०१ मार्च रोजी बैठक घेणार आहेत. या बैठकीत आयटी पार्क संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.

नाशिक मध्ये ३०० एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या आयटी पार्क संदर्भात येत्या एक मार्च रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे नाशिकला येऊन बैठक घेणार असल्याची माहिती आज नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एक मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत या आयटी पार्कमध्ये कोणत्या कंपन्यांचा समावेश असणार आहे, कोणत्या कंपन्यांशी करार केला जाईल यासह इतर महत्वाचा विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.

खर तर नाशिकच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा आयटी हब असणार आहे. नाशिकमध्ये आयटी पार्क नसल्याने नाशिक मधील अनेक तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी जावं लागायचं. मात्र, आता नाशिक मध्येच आयटी हबची निर्मिती होत असल्याने नाशिकमधील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील तरुणांना देखील नाशिकमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान मुंबई-पुणे नंतर नाशिकमध्ये सुद्धा आयटी हब होणार असल्याने नाशिकरांच्या आशा उंचावल्या आहेत. केंद्र सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून, आयटी हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधांसाठी २० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे या आयटी हब संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची येत्या एक मार्च रोजी होणारी ही बैठक नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मानली जात आहे.