नाशिकमध्ये आता ‘हा’ संसर्गजन्य आजार पसरण्याचे प्रमाण वाढतंय

नाशिक: शहरात स्वाइन फ्लू या साथरोगाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या महिन्यात आतापर्यंत 13 रुग्ण आढळून आले आहेत , तर मागील महिना म्हणजेच जून मध्ये दोन रुग्ण आढळले होते. त्यामुळे शहरात एकूण 15 रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

दरवर्षी नाशिक शहरात 250 ते 300 रुग्णांची संख्या राहिलेली आहे. यामुळे यंदाही स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे . मागील महिन्यात जूनमध्ये शहरात केवळ दोन रुग्ण होते मात्र जुलै महिन्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या 13 इतकी झाल्याने रुग्णसंख्येतील ही वाढ चिंता निर्माण करणारी आहे. स्वाइन फ्लू आजार हवेतून ‘ एच -1 एन -1 ’ या विषाणूमुळे पसरतो. या आजारामुळे रुग्णांमध्ये सर्दी , खोकला , ताप , अंगदुखी , डोकेदुखी , उलट्या अशी लक्षणे असतात. परंतु , योग्य व वेळीच उपचार घेतले तर या आजारातून रुग्ण बाहेर पडू शकतो. मात्र, आजार अंगावर काढला आणि दुसऱ्या टप्प्यात गेल्यास श्वसनास त्रास होऊन रुग्ण दगावण्याची भीती असते. त्यामुळे लक्षणे आढळून आल्यास घरच्या घरी उपचार न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ . बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे .

शहरात कोरोनास्थिती आता कुठे पूर्वपदावर येत असताना पुन्हा स्वाइन फ्लू डोक वर काढत आहे. स्वाइन फ्लू सुद्धा कोरोना इतकाच घातक आहे. हा रोग सुद्धा संसर्गजन्य आहे तसेच या रोगानेही रुग्ण दगावू शकतो त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि काळजी घ्यावी , असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.