मोठी बातमी..! मनपा आयुक्त पदाचा पुलकुंडवार यांनी घेतला पदभार

नाशिक: नूतन आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नाशिकच्या महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. काल पुलकुंडवार यांची नाशिक महापालिका आयुक्त पदावर बदली झाली होती. अवघ्या चार महिन्यात रमेश पवार यांची नाशिकच्या पालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर चंद्रकांत पुलकुंडवार यांची नाशिकच्या महापालिका आयुक्त पदावर वर्णी लागली आहे. अशात आता पुलकुंडवार यांनी नाशिकच्या महापालिका आयुक्त पदाचा चार्ज हाती घेतला आहे.

काल रमेश पवार यांच्या जागी पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली होती. रमेश पवार हे मातोश्रीच्या जवळचे असल्याची चर्चा आहे. अशात अवघ्या चार महिन्यातच त्यांची बदली झालीये. तर दुसरीकडे नाशिकच्या महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणारे पुलकुंडवार एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याच्या देखील चर्चा आहेत.

कोण आहेत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ?

महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची शासनाचे अपर मुख्य सचिव नितीन शिंदे यांनी नियुक्ती केली आहे. डॉ. पुलकुंडवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याची चर्चा आहे. रस्ते विकास महामंडळाचे सर व्यवस्थापक संचालक म्हणून ते याआधी काम बघत होते. त्यांनी समृद्धी महामार्गांसाठीची भूसंपादन प्रक्रिया मोठ्या कौशल्याने हाताळली आहे. त्यासोबतच पुलकुंडवार २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी, पुनर्विकास अधिकारी म्हणून तर मेळघाट येथे विभागीय अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पात विशेष भूसंपादन अधिकारी नांदेडमध्ये निवासी जिल्हाधिकारी, परभणीत उपविभागीय अधिकारी, अंधेरीत एमआयडीसीचे उपमहाव्यवस्थापक म्हणून काम बघितले आहे. २००८ मध्ये महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून त्यानंतर तात्कालीन आरोग्यमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे.