नाशिकसह धुळे, नंदुरबारमध्ये आयकर विभागाचा दणका

नाशिक । प्रतिनिधी
आयटी आणि ईडीच्या धडक कारवाया सुरूच असून उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अत्तर व्यावसायिकाचा भांडाफोड केल्यानंतर ईडीने आपला मोर्चा उत्तर महाराष्ट्रात वळवला आहे. आयकर विभागाने (Income Tax department) नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले असून, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात आयटी आणि ईडीने (ED) कारवायांचा सपाटा लावला यामध्ये अनेक मोठे मासे हाती लागले आहेत. तर नुकत्याच एका कारवाईमध्ये अत्तर व्यावसायिकाकडे तब्बल २५७ कोटींचे घबाड सापडल्याची घटना घडली. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) देखील आयकर विभागाने छापेमारी करण्यास सुरवात केली आहे. नाशिकसह (Nashik) धुळे (Dhule) आणि नंदुरबारमध्ये (Nandurbar) विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये कोट्यवधी रुपये सापडले असून संबंधित तीन जिल्ह्यामधून २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान या कारवाईमध्ये ६ कोटींच्या रकमेसह ५ कोटींचे दागिने (Jewelry) देखील जप्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये मागील ५ दिवसामध्ये आयकर विभागाने तब्बल ३१ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये आयकर विभागाने २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

विशेष म्हणजे या कारवाईनंतर कोट्यवधींचे घबाड मोजण्यासाठी तब्बल १२ तास लागले आहेत. छाप्यामध्ये सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. छापेमारीमध्ये आढळलेली सर्व बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे. संशयित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.