नाशिकमधील चैन स्नॅचिंग थांबणार कधी? महिलांचे जीव धोक्यात..!

नाशिक | प्रतिनिधी
नाशकात ‘स्नॅचर’ चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. नुकताच नांदूर परिसरात वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चैन चोरट्याने ओरबडल्याची घटना घडली आहे. चैन स्नॅचिंग च्या घटनांमुळे महिलांच्या जीव धोक्यात आला आहे.

नाशिकमध्ये मोबाइल व चैन स्नॅचिंगचे प्रकार सर्रास घडत आहेत. रस्त्यावर चालणाऱ्याच्या हातातील मोबाइल लांबविणे, तसेच दुचाकीस्वाराच्या वरच्या खिशातील मोबाइल उडविणे हे प्रकार तर नित्याचे बनले आहेत. शिवाय चेन स्नॅचिंगचा प्रकारही मोठ्या प्रमाणात चालू असून, आठ-पंधरा दिवसांत शहरात वेगवेगळ्या भागात या घटना जोर धरत आहेत.

काही दिवसांपूर्वी इंदिरानगर भागातील हॉस्पिटलजवळ रिक्षातून उतरत असलेल्या वृद्ध महिलेची गळ्यातील पोत लांबविली. त्याचा तपास लागत नाही, तोच गंगापूर रोडवर सकाळी चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या जवळ जात त्यांच्या गळ्यातील पोत, मंगळसूत्र ओरबाडल्याच्या घटना घडत आहेत.

या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही अनेक दिवस तपास लागत नाही. या चेन स्नॅचिंग प्रकारात लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चेन स्नॅचिंग करताना गळा कापला जाऊन जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिकमधील पोलीस प्रशासन या वाढत्या प्रकाराबद्दल काय कारवाई करणार आहेत, असा सवाल केला जात असून, नुसते पेट्रोलिंग करून उपयोग नाही, तर कार्यवाही होऊन चोरटे पकडणे महत्त्वाचे आहे. वरिष्ठांनी या प्रकारात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.