चिमुकल्याचा हात आणि करंगळी कापत अमानुषपणे हत्या

मनमाड : बेपत्ता असलेल्या एका चिमुकल्याची निर्घृण पणे हत्या (The brutal murder of a missing child) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घरातून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला इयत्ता चौथी शिकणाऱ्या एका ९ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह मनमाडमध्ये आढळून आला. मनमाडच्या फिल्टर हाऊस जवळील पुणे लोहमार्गाशेजारी हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. लोकेश सोनवणे असं मृत मुलाचं नाव असून त्याची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारेकराने मृतदेहाचा उजवा हात आणि करंगळी कापली असून चिमुकल्याच्या चेहऱ्यावर ओरखडे देखील आढळून आले आहेत. त्यासाठी करवतही वापरण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले असून नातेवाईकांसह संपूर्ण मनमाड मध्ये या घटनेविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. नेहरू भवन जवळ एकलव्य नगर मध्ये राहणारा लोकेश हा संध्याकाळी भाड्याची सायकल घेऊन फिरायला गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी मुलाची शोधाशोध केली पण तो मिळून येईना म्हणून मुलगा हरवल्याची तक्रार आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात दाखल केली. परिसरासह बाहेरगावातही चिमुकल्याची रात्रभर शोधमोहीम सुरू होती. मात्र गुरुवारी सायंकाळी त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.

या अमानुषपणे केलेल्या हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मुलगा जी भाड्याची सायकल घेऊन गेला होता ती सायकल देखील गायब आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. पोलिसांनी या संदर्भात एका संशयताला ताब्यात घेतल्याचं कळतंय. या अमानुष हत्येप्रकरणी संतप्त नागरिकांनी कॅन्डल मोर्चा काढला होता. लोकेशला न्याय मिळालाच पाहिजे, गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांकडून कॅण्डल मार्च काढण्यात आला. दरम्यान लोकेशला निश्चित न्याय मिळेल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.

अशाप्रकारे वाढत्या गुन्हेगारी घटना काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आहेत. मुख्य म्हणजे हत्येच्या घटना तर समोर येतच आहे. मात्र हे हत्या करण्याचे प्रकार किंवा हत्या करूनही मृत शरीराची केली गेलेली विटंबना अत्यंत भयावह आहे आणि या भयावह घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे मनुष्य रुपात असलेल्या राक्षसाचे दर्शन वेळोवेळी देशाला घडत आहे. जे ऐकल्यानंतर माणसाचा आत्मा देखील थरथरतो ते करताना गुन्हेगाराचा हातही थरथरत नसेल का ? असा प्रश्न या घटना पाहिल्यावर किंवा ऐकल्यावर पडल्याशिवाय राहणार नाही.